पिंपरी : तळवडे येथील किसनराव अंतुजी भालेकर प्राथमिक शाळेने नुकतेच शंभर वर्षे पूर्ण केले आहेत. २३ फेब्रुवारी १९१८ साली या शाळेची स्थापना झाली होती. शंभर वर्षांपासून येथे सुरू असलेल्या शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. शताब्दी वर्षांत ही शाळा डिजिटल झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचा या शाळेकडे ओढा वाढत आहे.
आदर्श शाळा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे तळवडेची प्राथमिक शाळा. सरकारच्या दहा कलमी कार्यक्रमांतर्गत शाळेने पुरस्कार मिळवला आहे. अवघ्या सहा शिक्षकांच्या हाती या शाळेची धुरा असली तरी शाळेतील स्वच्छता व उपक्रमांची यादी बघितली तर आश्चर्य वाटते. स्वच्छतेपासून तर सौरऊर्जेपर्यंतचा प्रकल्प बघून शाळेतील आधुनिकतेची जाणीव होते. शाळेच्या प्रवेशद्वारापासून शाळेतील स्वच्छता झाडांचे संवर्धन नजरेस पडते. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने महापालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीचे पाच हजार रुपयांचे बक्षीस शाळेला मिळत आहे. गांडूळ खत, रेन हॉर्वेस्टिंग, परस बाग, औषधी वनस्पतींची लागवड असे पर्यावरणपूरक प्रकल्प शाळेमध्ये राबविले जातात. सुसज्ज वाचनालय, संगणक, ई-लर्निंग विभाग आहे. येथील सौरऊर्जा प्रकल्पावर संगणक कक्षातील पाच संगणक चालतात. त्यामुळे वीजबिलामध्ये बचत होते. वाचनालयामध्ये विविध गोष्टींची व चित्रांची पुस्तके उपलब्ध आहेत. तेथे विद्यार्थी समूहवाचन, जोडी वाचन करतात.सीएसआर निधीचा वापरविविध कंपन्यांद्वारे नवनवीन उपक्रम शाळेमध्ये राबविले जातात. कॅपजेमिनी कंपनीकडून येथे स्पोकन इंग्लिशचे तास सुरू केले जाणार आहेत. बजाज कंपनीकडून ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टर व संगणक देण्यात आले आहेत. चित्रफितीच्या माध्यमातून शिक्षण दिले जात असल्यामुळे मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांनी येथील शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते.आरोग्य शिबिरे घेऊन दंत तापासणी व इतर तपासण्या केल्या जातात. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. तेथे मुलांना विविध प्रयोग करून दाखविले जातात. रोपवाटिकासारखे उपक्रम राबवून मुलांमध्ये वृक्षसंवर्धनाची गोडी निर्माण केली जाते. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी शिक्षक संतोष घनवट, वैैभव सुपे, सुभाष पारधी, रुक्साना अत्तार हे प्रयत्न करतात.