पुणे : सर्वांच्या लाडक्या बाप्पाला निराेप देण्यासाठी आता अवघा एक दिवस उरला आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने देखील पूर्ण तयारी केली आहे. गणेश मुर्तीचे दान केल्यास पालिकेकडून दाेन किलाे खत माेफत देण्यात येणार आहे. गणेश मुर्तीचे नदीत विसर्जन केल्याने नदीचे माेठ्याप्रमाणावर प्रदुषण हाेत असते. त्यामुळे आता नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी जीवित नदीने पुढाकार घेतला असून हाैदात मुर्ती विसर्जन करणाऱ्या तसेच मुर्ती दान करणाऱ्या कुटुंबाला पर्यावरण रक्षाणाप्रती एक पाऊल उचलल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पाच दिवसाच्या गणपतीचे नुकताच विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील घाट माथ्यावर चांगला पाऊस हाेत असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाणी साेडण्यात येत आहे. शनिवारी माेठ्याप्रमाणावर पाणी नदीत साेडण्यात आले. त्यामुळे नदी पात्र साेडून वाहू लागली. या नदीच्या पाण्यात गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आल्याने पाणी ओसरल्यावर त्या मुर्ती नदी किनारी पडलेल्या दिसून आल्या. पालिकेने तत्परतेने त्या सर्व मुर्ती उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून जीवित नदी ही संस्था नदीचे प्रदूषण राेखण्यासाठी काम करते. यंदा या संस्थेकडून गणेश विसर्जनदिनी अनाेखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गणेश मुर्तींचे हाैदात विसर्जन करण्याचे आवाहन या संस्थेकडून करण्यात येते. जे कुटुंब हाैदात विसर्जन करते त्या कुटुंबातील लहान सदस्याला या संस्थेकडून पर्यावरण रक्षणाबाबत पाऊल उचलल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येते. या संस्थेच्या अध्यक्षा शैलजा देशपांडे म्हणाल्या, पाओपी आणि शाडू या दाेन्ही प्रकारातील मुर्ती या नदीच्या पाण्यात विरघळत नाहीत. कुठलिही मानवनिर्मित गाेष्ट नदीत विसर्जित केल्यास नदीचे प्रदूषण हाेत असते. त्यामुळे शक्यताे मुर्ती दान करण्याचे आवाहन आम्ही नागरिकांना करताे. त्याचबराेबर जे कुटुंब हाैदात गणेश मुर्तींचे विसर्जन करेल त्या कुटुंबाला आम्ही पर्यावरण रक्षणाचे प्रमाणपत्र देत आहाेत. तसेच एक राेप सुद्धा देणार आहाेत.