पुणे :पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून २ हजार ५०० सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका शाळांतील आठवी आणि नववीच्या मुलींना ही लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ही लस नववीच्या मुलींना दिली जाणार आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून लस खरेदीसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी हा निविदा भरण्याचा अंतिम कालावधी आहे. दोन वर्षासाठी लस या माध्यमातून घेण्यात येणार आहे. लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नववीतील आणि त्यानंतर इयत्ता आठवीच्या मुलींनाही लसीकरण करण्यात येणार आहे. मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. अनियमित मासिक पाळी, वजन कमी होणे, गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे, वारंवार लघवीला होणे, छातीत जळजळ होणे, जुलाबाचा त्रास होणे ,भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे ,खूप जास्त थकवा जाणवणे ,ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे ,बऱ्याच वेळेस थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे, शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे, मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. सर्वायकल कॅन्सर हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि दुसरा म्हणजेच एडेनोकार्सिनोमा. एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सरची समस्या दिसून येते. त्याशिवाय आनुवंशिकता हेही याचे प्रमुख कारण आहे. तसेच, अभ्यासांत हा सर्वायकल कॅन्सर हा कौटुंबिक इतिहासामुळेही होऊ शकतो असंही आढळून आलं आहे. तसेच, सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो.