पुणे : राज्य सामायिक परीक्षा कक्षातर्फे राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बदललेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणारी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे, असे सीईटी सेल तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे (सीईटी सेल) पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार ही परीक्षा १३ ते २३ एप्रिल दरम्यान घेतली जाणार होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केल्यानंतर ही प्रवेश परीक्षा आणखी काही दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
वृत्तपत्रविद्येची परीक्षाही पुढे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. सुधारित वेळापत्रक नंतर कळविण्यात येणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख प्रा. उज्ज्वला बर्वे यांनी दिली. विद्यापीठातर्फे दोन्ही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांची परीक्षा येत्या 7 एप्रिलला होणार होती.