पुणे : ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता ते कलम रद्द झाले आहे. त्यामुळे आता ते लवकरच बाहेर येतील. छगन भुजबळ यांच्यासारखा लढवय्या नेता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे, मात्र लवकरच ते जेल बाहेर येतील, असे संकेत समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात समता दिन कार्यक्रमात बोलताना दिले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भूमी येथे महात्मा फुले समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री उपेन्द्र कुशवाहा, परिषदेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदले, खासदार पंकज भुजबळ, राजस्थान येथील मोतीलाल सांकला, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार अॅड. जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माली यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी शरद पवार म्हणाले, की महात्मा फुले यांनी त्या काळी समाजाचा प्रचंड विरोध असताना, रुढी-परंपराचा पगडा असतानाच्या कालात आधुनिक व विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवला. परदेशातील आधुनिक विज्ञानाचा वापर करुन कृषी, शिक्षण, स्त्री शिक्षण क्षेत्रात बदल घडविन्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांना अभिप्रेत असणारा हाच विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवल्यास राज्याची व देशाची प्रगती होईल. छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना पवार म्हणाले, भुजबळ यांनी केलेल्या संघर्षातूनच महात्मा फुले वाडा आणि परिसराचा विकास झाला आहे. महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे, यासाठीही त्यांनीच मोठे काम केले. मी मुख्यमंत्री असताना फुले यांचे समग्र वाड:मय १५ भाषांमध्ये भाषांतरीत केले. त्यामुळे फुले यांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.
छगन भुजबळ लवकरच बाहेर येतील; दिलीप कांबळे यांचे पुण्यात समता दिन कार्यक्रमात वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:41 PM
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भूमी येथे महात्मा फुले समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देभुजबळ यांनी केलेल्या संघर्षातूनच महात्मा फुले वाडा आणि परिसराचा विकास : शरद पवारज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माली यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान