लोकमत न्यूज नेटवर्क
खेड शिवापूर : कोंढणपूर फाटा येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी येथे एकाला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
दीपक धनाजी जगताप (वय २६, रा. रांजे ता. भोर), ऋषिकेश सुनील रणपिसे (वय २२, रा. रांजे, ता. भोर), यश गणेश देवकर (वय २१, रा. रांजे ता. भोर), गणेश सुरेश शेळके (वय २१, रा आर्वी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
कोंढणपूर फाटा येथील पुलाखाली दोन दुचाकींवर चाैघे तरुण थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष तोडकर यांना मिळाली. राजगड पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्या वेळी चाैघे तरुण त्याच ठिकाणी होते. पोलिसांनी त्यांची चाैकशी सुरू केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चौघांनाही पकडले. त्यांची झडती घेतली असता दीपक जगतापच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चाैघांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी गावात एकावर पिस्तुलातून गोळी झाडत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. याबाबत उस्मानाबाद पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. ही कामगिरी सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलीस हवालदार संतोष तोडकर, पोलीस नाईक कोल्हे, पोलीस शिपाई कोकणी, पोलीस शिपाई कारंडे यांनी केली आहे.