पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. आशिष बनगीनवार याला दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी पुणे महापालिकेने तीन सदस्यीय समिती नेमली असून, या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
प्रथम वर्ष प्रवेशातील संस्था स्तरावर दिल्या जाणाऱ्या १५ जागांवरील प्रवेशादरम्यान पालकांकडून शुल्काव्यतिरिक्त लाखो रुपये लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई झाली. याप्रकरणी पुणे महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली आहे. डॉ. आशिष बनगीनवार याची नियुक्ती दोन वर्षांसाठी आहे. त्यामुळे निलंबित न करता थेट नोकरीतून बडतर्फ केले जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
झेंडे खराब निघण्याचे प्रमाण ४० टक्के :
हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत पुणे महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला सुमारे ४ हजार राष्ट्रध्वज दिले आहेत. त्यापैकी ४० टक्के झेंडे खराब निघत आहेत. असे झेंडे परत केले जातील, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.