पिंपरी : सोनसाखळी चोरीचे गुन्हे करून पोलिसांपासून बचावासाठी सराईत गुन्हेगाराने नाव बदलले. तसेच बदललेल्या नावानुसार आधार कार्ड बनवून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, या सराईताला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून आठ लाख ४८ हजार ८०० रुपयांचे २३१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर श्रीकांत नान्नजकर (वय ४६, रा. भोसरी, मूळगाव जुना कळंबरोड, एमआयडीसी लातूर) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. आरोपी नान्नजकर दि. ३ डिसेंबर रोजी भोसरी येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला.
आरोपी नान्नजकर तेथे आला असता, पोलिसांनी सापळा लावल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी त्याने सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला न्यायलयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.आरोपी नान्नजकर याने एका साथीदारासह पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तसेच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ अशा एकूण १० ठिकाणी सोनसाखळी चोरीचे प्रकार केले आहेत. दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून गुन्हे केल्याचे निष्पत्र झाले आहे. चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्याने त्याच्या ओळखीच्या सोनारांकडे आईचे आजारपणाचे कारण सांगून विकले व गहाण ठेवले होते. ते दागिने व त्याच्याकडेच मिळून आलेले दागिने असे एकूण आठ लाख ४८ हजार ८०० रुपयांचे २३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहायक पोलीस फौजदार रवींद्र राठोड, रवींद्र गावंडे, पोलीस कर्मचारी आप्पा लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगिर, मारूती जायभाये, सचिन मोरे, प्रवीण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, गणेश सावंत व तानाजी पानसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.सराईत गुन्हेगार होता दोन वर्षे जेलमध्येआरोपी नान्नजकर रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरूध्द निगडी, डेक्कन, लोणी काळभोर, एमआयडीसी लातूर, हडपसर या पोलीस ठाण्यांना वाहन चोरी, आर्म अॅक्ट असे आठ गुन्हे दाखल आहेत. नान्नजकर सुमारे दोन वर्ष जेलमध्ये होता. आरोपी समीर श्रीकांत नाज्जकर याने पोलिसांपासून लपण्यासाठी आपले स्वत:चे नाव बदलून विनायक श्रीकांत मान्नजकर या नावाचे आधार कार्ड तयार केल्याचे उघड झाले आहे.