जेजुरी: यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणारा जेजुरीच्या खंडेरायाचा चित्र पौर्णिमा उत्सव कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला.
पुजारी ,सेवेकरी मानकरी यांच्या मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी करत साजरा झाला .गेल्या एक महिन्यापासून प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांना देवदर्शन बंद करण्यात आले असून गडाचे दरवाजेही बंद आहेत .मात्र नित्यनियमाने पहाटेची पूजा -अभिषेक भूपाळी ,आरती ,दुपारची मध्यान्ह पूजा व रात्रीची शेजपूजा व आरती मोजक्या पुजारी व सेवेकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केली जात आहे. गतवर्षीही कोरोना महामारीचा सामना करताना मंदिर बंद होते . सुमारे १४ महिन्याच्या काळामध्ये श्रींचे सर्व जत्रा यात्रा उत्सव रद्द करण्यात आले होते. चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त- नानासाहेब दिनकरराव पाचुदकर पाटील यांच्या वतीने खंडेरायाचा गाभारा व मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे .
चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते. राज्याच्या विविध प्रांतांतील बहुजन बांधव व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल होत यळकोट... यळकोट असा गजर करीत भंडाऱ्याची उधळण करीत कुलधर्म-कुलाचार करतात.