चाकण : चाकण पालिकेच्या शिवसेना नगरसेवकाच्या विरोधात बुधवारी (दि. १५) रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या याच नगरसेवकाने चाकण पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार नऊ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील चौघांना अटक करण्यात आली.
किशोर ज्ञानोबा शेवकरी (वय ४१, रा. वैशाली कॉम्प्लेक्स, आंबेठाण चौक, चाकण) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने बुधवारी (दि. १५) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला राहत असलेल्या घराच्या पार्किंगमध्ये येऊन शेवकरी याने रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच पीडितेशी गैरवर्तन करून विनयभंग केला.
दोन दिवसांपूर्वी शेवकरी यांच्या विरोधात एका महिलेला वारंवार चाकण पोलीस ठाण्यात खोटी विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या महिलेला तक्रार देण्यापासून परावृत्त करण्यासाठी चक्क १५ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार शेवकरी यांनी दिली होती. त्यानुसार नऊ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील चौघांना अटक करण्यात आली.