चाकण : चिंबळी फाटा ( ता. खेड ) येथील सहारा दूध डेअरीमधील बॉयलरची सफाई करताना निष्काळजीपणा केल्याने बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले. त्यात चार कामगार गंभीर भाजले असून त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाळुंगे चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली. मुकेश रामलाई कश्यप (वय.३० वर्षे ) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. सोनू श्रीप्रभूदयाल कश्यप (वय.२६ वर्षे), राहुल संतोष कुमार माथूर (वय.१८ वर्षे ), इसाक अकबर कोतवाल (वय.४५ वर्षे सर्व रा.चिंबळी फाटा ) अशी या घटनेत भाजून गंभीर जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.
या घटनेप्रकरणी सहारा दूध डेअरी येथील ऑपरेटर अब्दुल गफार अब्दुल रशीद मुल्ला (वय.४४ वर्षे रा.कलागोडवस्ती, धानोरी, पुणे) आणि व्यवस्थापक मोहितकुमार राजबहादूर सिंग (वय.५५ वर्षे रा. कुरुळी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल मुल्ला हा सहारा दूध डेअरी मध्ये बॉयलर ऑपरेटर म्हणून काम करतो. बॉयलर ऑपरेटर आणि व्यवस्थापक सिंग हे दूध डेअरी मधील बॉयलर साफ करून घेत होते. त्यावेळी त्यांनी बॉयलर शेजारी थांबलेल्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. बॉयलरच्या टाकीतील पाण्यात निष्काळजीपणे नेहमीपेक्षा जास्त डिस्क्लीनर नावाचे केमिकल टाकले. दरम्यान बॉयलरच्या टाकीचे झाकण उघडे ठेवले यामुळे बॉयलर मधील पाणी जास्त गरम झाले.
पाण्याचा दाब वाढला आणि उकळते पाणी शेजारी थांबलेल्या कामगारांच्या अंगावर उडाले. यात चार कामगारांच्या हाताला, पायाला, पोटाला, पाठीला, चेह-यावर ठिकठिकाणी गंभीररीत्या भाजले.चारही जखमी कामगारांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी कामगार मुकेश कश्यप याचा मृत्यू झाला. महाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत.