लोकमत न्यूज नेटवर्कआसखेड : चाकण येथील बसस्थानक म्हणजे अनधिकृत वाहनांचे ‘अधिकृत’ वाहनतळ झाले आहे. अनेक गुंठामंत्री, सामाजिक कार्यकर्ते, पुढारी आदींच्या वाहनांमुळे तसेच स्थानकाच्या आवारातील व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने यामुळे बसस्थानकात बसगाड्या कमी आणि इतर वाहने उभी असल्याने या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जागा नसल्याने त्यांना उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. चाकण बसस्थानक पुणे-नाशिक महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी चाकण या स्थानकाचे ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ या तत्त्वावर नूतनीकर करण्यात आले. बसस्थानकाच्या आवारात अनेक व्यापारी गाळे आहेत. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने बसस्थानकाच्या आवारातच उभी केली जातात . त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या अनेक बस स्थानकाकडे न वळता हमरस्त्यावरून परस्पर जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. केवळ नगर, बीड, औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बस आवारात येतात. त्यामुळे बसस्थानक असल्याची जाणीव होते. चाकण बसस्थानकात असणाऱ्या बेकायदा वाहनतळामुळे व स्थानकाच्या दुतर्फा बसणाऱ्या किरकोळ भाजी विक्रेत्यांमुळे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी येथील एक वृद्ध नागरिक एसटी बसच्या खाली चिरडून त्याचा मृत्यू झाला होता. तसेच मागील वर्षी भाजी खरेदी करत असताना स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एका महिलेला वाहनाने चिरडले होते. किरकोळ अपघात तर अधूनमधून होतच असतात, तरीही प्रशासनाला जाग येत नाही. बसस्थानकात बेकायदा वाहने लावणारी मंडळी चाकण शहरातील राजकारणी असल्याने जाणीवपूर्वक याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत. या परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांची महामार्गावर दुतर्फा दुकाने असल्याने वाहतूककोंडी होत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कित्येकदा येथे भरणाऱ्या भाजीपाला बाजाराला बंदी घालण्यात आली होती. पुन्हा येरे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे बाजार सुरू झाला. चाकण बसस्थानकातील बेकायदा वाहनतळ व स्थानका शेजारचा बाजार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे
चाकण बसस्थानक बनले वाहनतळ
By admin | Published: May 26, 2017 5:41 AM