लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यत्रंणा सज्ज झाली आहे. २३ प्रभागांच्या निवडणूक प्रारूप मतदार याद्या नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड चुका झाल्याचे समोर आल्याने नागरिकांनी नगरपरिषदेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
चाकण परिषदेची दुसरी पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. २३ प्रभागांच्या निवडणूक मतदार याद्या नगरपरिषद कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांची नावे गायब झाली, तर काहींची नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. मुटकेवाडी परिसरातील अनेक नागरिकांची नावे शेजारील नाणेकरवाडी ग्रामपंचायतच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याबद्दल दुरुस्ती करून पुन्हा चाकण पालिकेत नावे घेण्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती अर्ज करूनही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष धीरज मुटके यांनी केला आहे. मुटके यांनी सांगितले की, माझ्या नावासह माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावेच चाकण पालिकेच्या मतदारयादीतून गायब झाली आहे.
चाकण पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सामान्य मतदारांना बसला आहे. कारण मतदार याद्यांमध्ये पुरुषांच्या नावापुढे स्त्रियांचे फोटो असणे तसेच मतदार ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागात नाव असणे आवश्यक आहे. परंतु, अनेकांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेली आहेत. यामुळे मतदारांना सर्व कामे सोडून आपली नावे दुरुस्ती करण्यासाठी वेळ द्यावा का? मग प्रशासन काय करत आहे? काही प्रभागांत मतदारांची संख्या कमी जास्त असल्याने जास्त मतदारसंख्या असलेल्या प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला निवडणूक मोठी कसरतीचे असणार आहे. तर प्रभागात मतदारांची कमी संख्या असलेने फक्त शंभर दोनशे मताने विजयी मिळवणे सोपे आहे. यातही बदल करून प्रभागातील मतदार संख्या समान करण्याची निवडणूक आयोग तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पालिकेच्या निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. यामुळे चाकणकर नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद गायकवाड केला आहे. तर माजी सरपंच नंदकुमार गोरे, रोनक विनोद गोरे, कुमार गोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाने प्रारूप मतदार याद्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
*
कोट
नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याबाबत १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याचे आवाहन मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी केले आहे.