चाकण (पुणे) : कामावरून कमी केल्याच्या कारणावरून औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे (ता. खेड) येथील फ्लॅश कंपनीच्या आवारात एका परप्रांतीय कामगाराने कंपनी सुपरवायझरवर कोयत्याने हल्ला करून त्यास जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. ३ ) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुपरवायझर विकास चव्हाण (वय ३२, रा. महाळुंगे; मूळ रा. कारपा पो. गिरोलीता मानोरा, जि. वाशिम) यांनी म्हाळुंगे पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपी सुरजकुमार रामदुल्हारे (सध्या रा. महाळुंगे, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण औद्योगिक वसाहतीच्या म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीतील फ्लश कंपनीत फिर्यादी विकास चव्हाण हे कंपनीचे सुपरवायझर म्हणून कामास आहेत. त्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपीला काही कारणांवरून कामावरून घरी पाठवले, त्याचा राग मनात धरून आरोपी सायंकाळी कंपनीच्या गेट समोर थांबला होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला, 'तू कशासाठी थांबला आहेस?' असे विचारले असता आरोपीने त्याच्या हातातील पिशवीमधील कोयता काढून फिर्यादीच्या हातावर वार केला. त्यानंतर फिर्यादी कंपनीमध्ये पळून जात असताना आरोपीने पाठलाग करून कोयत्याने पाठीवर वार करून जबर दुखापत केली.