चाकण : चाकण नगरपरिषद प्रभाग रचना व मतदारयादीच्या घोळप्रकरणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काही इच्छुकांनी याचा गैरफायदा घेत आपल्या मर्जीतील खात्रीशीर मतदार अन्य प्रभागातून आपल्या प्रभागात आणल्याचे प्रारूप मतदारयादीतून स्पष्ट झाले आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
चाकण नगरपरिषद निवडणुकीची प्रारूप मतदारयादीत मोठ्या संख्येने नावांचा घोळ झाला आहे. याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु कामातील गैरप्रकार थांबण्याचे चिन्हे दिसत नाहीत. अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल केलेल्या याचिकेत प्रभाग रचना २०१५ ला एक सदस्यीय व सन २०११ च्या जनगणनेवर आधारीत असताना, त्यावरच चक्राकार आरक्षण काढण्याऐवजी नव्याने सन २०११ प्रमाणे जनगणना निकषावर नव्याने प्रभाग रचना करून, चक्राकार आरक्षण काढणे चुकीचे होते. यात मूळ प्रभागात मोठे बदल झाले आहेत. आता प्रवासी नागरिकांना मतदान अधिकार दिला. मात्र त्यांची लोकसंख्या विचारात घेतली गेली नाही. सध्या २३ ऐवजी ३३ प्रभाग होणे आवश्यक आहे. तरीही नागरिकांच्या मूलभूत अधिकार व पायाभूत विकासावर प्रतिबंध करत चुकीची प्रक्रिया रेटण्याचा प्रकार प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी यात बदल करण्याची मागणी केली आहे. प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला आहे. मतदार राहतो एका प्रभागात त्याच नाव दुसऱ्या प्रभागात अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह त्यांच्याच प्रभाग क्रमांक २३ मधील अंदाजे २०० नावे शेजारील नाणेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत गेली आहेत. मुख्याधिकारी शहरातील सन २०११ जनगनणा अंतर्गत सर्व लोकसंख्या विचारात घेतली असे म्हणतात. एकंदर सर्व संभ्रम व घोळ निर्माण झाला असून निवडणूक पारदर्शक व घोळमुक्त लोकाभिमुख व्हावी म्हणून उच्च न्यायालयात चाकण विकास मंच, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपसह शहरातील असंख्य नागरिक व संस्था यांचे सामूदायिक प्रतिनिधी म्हणून मंचाचे अध्यक्ष कुमार गोरे यांनी याचिका दाखल केली आहे. यावेळी दत्ता गोरे, महेंद्र गालफाडे, मुबिन काझी उच्च न्यायालयात उपस्थित होते. पुढील आठवड्यात यावर सुनावणी अपेक्षित होइल, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
* फोटो - उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना उपस्थित चाकणकर नागरिक.