चाकण : चाकण परिसरात अल्पवयीन मुले खून, हाणामाऱ्या, वादविवाद, चोऱ्या, दादागिरी आदी प्रकरणासह व्यसनांकडे वेगाने वळताना दिसून येत आहे. मागील पाच सहा वर्षात चाकणच्या भोईकोट किल्ल्यातील रस्त्यावर एका मुलाचा खून, त्यानंतर काळूस आणि मेदनकरवाडी येथेही खुनाच्या घटना आणि पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी चाकण शहरात अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनांचा मागोवा घेतला तर अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत, हे यावरून स्पष्ट होते.
चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे इझी मनीला महत्त्व वाढले आहे. यामुळे कंपन्यांमध्ये विविध कामांचे ठेके घेण्यासाठी गुन्हेगारी वाढली आहे.परिसरात अल्पवयीन मुलांच्या अनेक गॅंग आणि टोळ्या तयार झाल्या आहेत. भाऊ, भाई, दादा, भावा, महाराज आदी नावांनी ग्रुप, टोळ्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ऍक्शनमधील फोटो फ्लेक्स, सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धमक्या देणे, जमिनीचे ताबे घेणे, कंपन्यांमध्ये ठेके घेणे, दहशत निर्माण करणे, खंडणी वसुली, हप्ता गोळा करणे आदी कामे अशा ग्रुपकडून केली जात आहेत. अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांना आणि ग्रुपला गॉड फादर असून, तेच यांना रसद पुरवून त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाई करून घेत आहेत.
चाकण पंचक्रोशीतील युवक व अल्पवयीन मुलांनी टोळ्या व ग्रुप करायचे व त्या माध्यामातून गुन्हेगारी करण्याचा नवा फंडा या परिसरात रुजू होत आहे. गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलिस व समाजासमोर निर्माण झाले आहे. गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या बंद करावयाच्या असतील, तर या टोळ्यांमध्ये होणारी भरती थांबवावी लागेल. त्यासाठी त्यांतील प्रमुखांना कायद्याच्या कचाट्यात घ्यावे लागेल. नुसत्या दंडूकेशाहीने हा प्रश्न सुटणार नाही. बहुतेक मोठ्या कुख्यात गुन्हेगारांनी त्यांच्या गुन्हेगारीची सुरूवातच बालवयात केल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये व समाजाला वेठीस धरणारा गुन्हेगार तयार होऊ नये. यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता या भागात निर्माण झाली आहे.
* चाकण परिसरातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये बाल गुन्हेगारांचा सहभागी दिसून येतो आहे.यातील मुलांच्या घराची परिस्थिती बेताची असल्याने आई वडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि घरच्यांचा नसलेला धाक यामुळे अशी मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या माध्यमातून अशा मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात आहेत. पालकानींही आपल्या पाल्यांकडे जागरूक राहून लक्ष देणे गरजेचे आहे. - अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे.
* बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनी संस्कारक्षम वयातच मुलांना चांगल्या वाईट गोष्टींचे परिणाम काय होतात याची माहिती देणे आवश्यक आहे. आपली मुले, दिवसभर कुठे फिरतात? कोणाबरोबर असतात? ते नियमित अभ्यास करतात का? याकडे लक्ष द्यायला हवे. - सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे.
----------------------------