महाळुंगे : चाकणमधील बेकायदा प्लॉटिंगचे पंचनामे नगर परिषदेने सुरू केले आहेत. राजकीय दबाव झुगारून या घटनेची खरीखुरी पाळेमुळे खोदल्यास गोरगरिबांना फसवून आणि कुठल्याही सोयी-सुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंग व्यवसायातील अनेकांचे बुरखे फाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चाकण एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या आठदहा किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत अद्यापही जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांना पीएमआरडीए व महसूल विभागाने चाप बसविण्याची मागणी होत आहे.नगर परिषद हद्दीत जमिनींचे रहिवास अथवा इतर कारणांकरिता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करण्याचे अधिकार नगर परिषदेस आहेत. जमिनीचे रेखांकन मंजूर केल्यानंतर, जिल्हाधिकारी संबंधित जमिनीच्या अकृषी वापरासाठी परवानगी देतात. त्यानंतरच जमिनींवर विकास केला जातो. मात्र, नियमांच्या फेऱ्यात जाण्याऐवजी अनेकांनी नगर परिषदेच्या अपरोक्ष बेकायदा शेत जमिनींचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा लावला होता.जमिनींचे रेखांकन मंजूर करताना नगर परिषदेकडून, तसेच नगररचना विभागाकडून रेखांकन धारकाने सुविधा पुरवाव्यात, अशा स्पष्ट अटी घालून दिलेल्या असतात. रेखांकित जमिनीत आवश्यक रस्ते, जल:निस्सारण गटारांची व्यवस्था, दिवाबत्तीची व्यवस्था, रेखांकित जमिनीत मोकळ्या ठेवण्यात आलेला भूखंड विकसित करून देणे व त्याला संरक्षक भिंत बांधून देण्याची जबाबदारी रेखांकन धारकाची असते. मात्र त्याकडे प्लॉटिंगच्या व्यवसायातील मंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित बेकायदा प्लॉटिंगचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. अनेक प्लॉटधारक नगर परिषदेकडून बांधकाम परवाना मागतात. मात्र, ती त्यांना देता येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. ना विकास शेत जमिनींचे प्लॉट पाडून दलाली मिळविणारी मंडळी अज्ञातवासात जात आहेत.या संपूर्ण व्यवहारांमध्ये अनेक प्लॉटिंग करणारे एजंट एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन ठराविक रकमेत खपवून देण्याची जबाबदारी ठराविक रक्कम देऊन घेत आहेत. व्यवहार करताना शेतीमालक आणि खरेदीदार याच्यात व्यवहार होतो. शेतकऱ्याला प्रती गुंठा दोन अडीच लाख रुपये देणारे एजंट खरेदीदार नागरिकांकडून प्रती गुंठा पाच ते दहा लाख रुपये उकळत आहेत. या संपूर्ण व्यवहारात एजंट मंडळी नामनिराळी राहत असून, कागदोपत्री कुठेही अडकत नाहीत. त्यामुळे पुढे त्यांचा शोध घेणे आणि या गैरप्रकारात असलेला संबंध स्पष्ट करणे कठीण होणार आहे. काही बडे गुंतवणूकदार थेट शेतजमीन कवडीमोल विकत घेऊन त्याचे प्लॉट पाडत आहेत, असे प्लॉट एनएन (अकृषिक परवानगी) न करताच विक्री केले जात आहेत. (वार्ताहर)मुख्याधिकारी साबळे : त्यांच्यावर कारवाई होणारचाकण नगर परिषदेने नगर परिषद हद्दीतील प्लॉटिंगचे पंचनामे केले आहेत. शनिवारपर्यंत पाच ठिकाणी असे पंचनामे करण्यात आलेले आहेत. बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांना एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावण्यात येणार असून, थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्लॉटिंगचा आराखडा (ले आउट) नगर परिषदेकडून मंजूर न करताच होत असलेल्या प्रकारांना चाप बसविण्यात येणार आहे. शेत जमिनींचे बेकायदा एका-एका गुंठ्यांचे प्लॉट पाडून विक्री होऊ नये यासाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयांना खरेदी-विक्री व्यवहार नोंदवू नयेत यासाठी नगर परिषदेकडून आदेश देण्यात येणार आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पत्रे देऊन अशा शेत जमिनींची खरेदी-विक्री झाल्यास सातबारावर त्याची नोंद होऊ नये यासाठी सूचित करण्यात येणार असल्याचे चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. बेकायदा प्लॉटिंग सुरूच राहिल्यास चाकण शहराचा बोजवारा उडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नगर परिषदेस स्वत:च्या खर्चाने रस्ते, गटारे, सार्वजनिक दिवाबत्ती आदी सुविधा पुरवाव्या लागत आहेत. नागरिकांची अजूनही अशा जमीन व्यवहारातील फसवणूक सुरूच असून आराखडा (ले आउट) सक्षम अधिकाऱ्याने (पीएमआरडीएने) मंजूर केला आहे का? बिगरशेती परवानगी (एन.ए) घेतली आहे का? याची खातरजमा होत नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.
चाकणला बेकायदा प्लॉटिंगचे पंचनामे सुरू
By admin | Published: May 04, 2017 2:10 AM