चाकण : खेड तालुक्यातील चाकणमध्ये नगरसेवकाकडेच तब्बल १५ लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी (रा. वैशाली कॉम्प्लेक्स , चाकण, ता. खेड ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकणचे माजी उपसरपंच, एक पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेच्या काही महिला अशा एकूण ९ जणांवर सोमवारी चाकण पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला नगरसवेकाने विनयभंग केल्याची खोटी तक्रार देण्यासाठी चाकण पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी शेवकरी यांच्याकडं १५ लाखांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉटसअप चॅटिंग पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. त्यानुसार माजी उपसरपंच प्रीतम परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल शिंदे, गीतांजली भस्मे, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, कुणाल राऊत, प्रणीत नामक एक इसम आणि चाकणमधील एक पत्रकार अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.