चाकण, तळेगाव, पुण्यासह पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्राला अद्यापही प्रतीक्षाच ;जिल्ह्यात केवळ ३० उद्योग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:03 PM2020-04-29T16:03:49+5:302020-04-29T16:06:39+5:30
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यासह विभागातील सर्व उद्योग, धंदे दीड महिन्यांपासून बंद
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे राज्य शासनाने 20 एप्रिल रोजी काही औद्योगिक क्षेत्राकरिता लॉकडाऊन शिथिल करून देखील पुणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य केवळ 30 युनिट सुरू झाले आहेत. तर अत्यावश्यक सेवेचे 692 युनिट सुरू झाले असून, यामध्ये सुमारे 21हजार कामगार काम करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव, हिंजवडी, पुणे, पिंपरी चिंचवड काही प्रमुख औद्योगिक क्षेत्रातील लॉकडाऊन उठण्याची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही.
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यासह विभागातील सर्व उद्योग, धंदे दीड महिन्यांपासून बंद आहेत. शासनाच्या आदेशानुसार 20 एप्रिल रोजी काही औद्योगिक क्षेत्राकरिता लॉकडाऊन शिथिल करून उद्योग धंदे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यात देखील दीड महिन्यांपासून बंद पडलेल्या औद्योगिक क्षेत्राला पुन्हा गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. यासाठी प्रत्येक एमआयडीसी क्षेत्रासाठी बंद युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देण्यासाठी स्वतंत्र अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. परंतु गेल्या आठ-दहा दिवसांत पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढायला लागली. पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या वाढीचा वेग आणि होणारे मृत्यु देशात सर्वाधिक असल्याचे समोर आले. यामुळे येथील यंत्रणा पुन्हा कोमात गेल्या सारखी झाली असून, सर्वच क्षेत्रांत नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अनेक उद्योग धंदे सुरू करण्याचे अर्ज प्रशासनाकडे येऊन देखील येते परवानगी देण्यात आली नाही.
सध्या केवळ शहरासह अन्य भागातील औषधे, फुड प्रोसेसिंग, अॅग्रिकल्चर प्रोसेसिंग, डिअर प्रॉडक्ट, यासाठी आवश्यक असलेल्या पॅकेजिंग क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही संख्या देखील मर्यादित असून, आतापर्यंत केवळ 692 युनिट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व युनिटमध्ये सध्या 21 हजार कामकार काम करत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
--------
पुणे महानगर क्षेत्रात उद्योग सुरू होणे कठीण...
राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्रातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करून टप्प्याटप्प्याने उद्योग धंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील परिस्थिती गेल्या काही दिवसांत अधिकच गंभीर झाली आहे. यामुळे पुणे महानगर क्षेत्रात उद्योग धंदे सुरू होणे सध्या तरी कठीणच आहे. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य केवळ 30 युनिट सुरू झाले आहेत. हे देखील कुरकुभसह जेजुरी या भागातील 30 युनिट सुरू झाले आहेत. यामध्ये केवळ स्थानिक त्या-त्या भागातील कामगार व कर्मचारी घेऊनच काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे .
- सदाशिव सुरवसे , माहिती सहसंचालक (उद्योग)