पुणे : चाकण आणि तळेगाव एमआयडीसीतील औद्योगिक वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली असून, आता ही समस्या लवकरच सुटणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक वाहतुकीसाठी नाशिक रोड ते जुना मुंबई महामार्ग जोडणारा सुमारे 45 किलो मीटरचा स्वतंत्र 4 पदरी रस्त्याचे काम हाती घेतले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या 90 टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले असून, कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
गेल्या काही वर्षांत चाकण आणि तळेगाव एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत अपेक्षित तेवढ्या सोयीसुविधा मात्र निर्माण झाल्या नाहीत. याचा परिणाम आता संपूर्ण पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव, मुंबई महामार्गावरील सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर परिणाम होत असून, प्रचंड वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली आहे. याचा सर्वाधिक फटका चाकण चौक, तळेगाव चौक येथील लोकांना बसत आहे. त्यात आता चाकण टप्पा पाच व तळेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने गुंतवणूक होत असून, भविष्यात औद्योगिक वाहतूक गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर पुणे एमआयडीसीच्या वतीने औद्योगिक वाहतुकीसाठी हा स्वतंत्र 4 पदरी रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यामध्ये चाकण टप्पा पाच मधील रोहकळ गावात काही प्रमाणात भूसंपादन शिल्लक असून, हा विषय देखील लवकरच सुटेल, अशी माहिती एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी दिली. ---------येत्या दोन-तीन वर्षांत चाकण आणि तळेगाव एमआयडीसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूक येणार आहे. सध्या सुरू असलेल्या कंपन्यांच्या दुपट्ट प्रमाणात नव्याने येणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढलेली असेल. या सर्व गोष्टींचा विचार करून, पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यात येत आहे. - अविनाश हदगल, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी