चाकणची वाहतूक कोंडी फुटणार; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 07:53 PM2021-06-12T19:53:38+5:302021-06-12T20:13:57+5:30
चाकणमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरला.
चाकण : पुणे- नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील मोशी ते चांडोली या टप्प्यातील १७ किमी लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. चाकणच्या तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.
शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह चाकण येथे रस्त्याची पाहणी केली.
चाकणमध्ये होणारी वाहतूक कोंडी हा लोकसभा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरला होता.खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सातत्याने नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंद्रायणी नदी (मोशी) ते चांडोली या १७/७०० कि. मी. लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली आहे.येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक फाटा ते मोशी या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील लांबीतील भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याने या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात मोशी ते चांडोली दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चाकणच्या तळेगाव चौक व एमआयडीसी चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून,दुसऱ्या टप्प्यात नाशिक फाटा ते मोशी या लांबीतील भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याबाबत निविदा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,चाकण शहराध्यक्ष राम गोरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे,नगरसेवक विशाल नायकवाडी आदी उपस्थित होते.