चाकण : येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयासमोर पुणे-नाशिक महामार्गावरून टेम्पोमधून गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर चाकण पोलीस व एफडीआयने संयुक्तरित्या कारवाई करून अंदाजे ५० लाख रुपये किमतीचा १८० पोती गुटखा पकडला. या प्रकरणी पथकाने दोघांना अटक केली असून त्यांच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुलजार जमलुद्दीन शेख (रा. वालिव चौक, वसई, जि. पालघर) व अरुण रावसाहेब खोत (रा. पंढरपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास करण्यात आली. या मार्गावरून टेम्पोतून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना खबºयांकडून मिळाली. त्यानुसार एसीपी चंद्रकांत अलसटवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, सातकर, अजय भापकर, एफडीआयचे अधिकारी महेंद्र पाटील व काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी अब्दुलजार जमलुद्दीन शेख (रा. वालिव चौक, वसई, जि. पालघर) व अरुण रावसाहेब खोत (रा. पंढरपूर) या दोघांना आयशर टेम्पोसह (एमएच १२/ एलटी ३९८६) ताब्यात घेऊन टेम्पोतील गुटखा जप्त केला आहे.