पुणे : ओबीसी आरक्षणासाठी शनिवारी (दि. २६) सकाळी दहा वाजल्यापासून कात्रज चौक परिसरात चक्काजाम आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर यांच्यासह ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होणार आहेत. कात्रज चौकातील आंदोलन संपेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.
स्वारगेटकडून कात्रजकडे जाणारी वाहतूक सिंहगड रस्तामार्गे नवले पुलाकडे तसेच मार्केट यार्ड चौकातून गंगाधाम रस्त्याने वळविण्यात येणार आहे. मुंबईहून कात्रजकडे येणारी वाहतूक नवले पुलाकडून सातारा रस्ता तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक दत्तनगर भुयारी मार्ग, कात्रज डेअरी, डावीकडे वळून स्वारगेटकडे जातील. कोंढव्याकडून येणारी वाहतूक खडी मशीन चौकातून शहराकडे सोडण्यात येणार आहे. सातारा रस्त्यावरून शिंदेवाडी येथून कात्रजकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. अवजड वाहने थांबवून हलकी वाहने कात्रज चौकातून दत्तनगरमार्गे बाह्यवळण मार्गावरून इच्छितस्थळी जातील. राजस सोसायटी ते वरखडेनगरमार्गे मांगडेवाडी फाटा, जुना कात्रज बोगदा येथून इच्छितस्थळी जातील.