चाकण : चाकण शहरातील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून चाकण पोलिसांनी बुधवारपासून प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. त्यासाठी येथील महात्मा फुले चौकात बॅरिकेड लावण्यात आले आहेत. ही एकेरी वाहतूक सध्या तरी चारचाकी वाहनांसाठी करण्यात आली आहे. येथील महात्मा फुले चौकातून नगर परिषद व माणिक चौकाकडे चारचाकी वाहनांना जाता येणार नाही. ही एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर चालविताना नागरिकांच्या अडचणी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सूचना आल्यास सुधारणा करण्यात येणार असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.
माणिक चौक, मराठी शाळा, नगरपरिषद, बालाजी टॉवर्स व भाजी बाजार ही वाहतूककोंडीची मुख्य ठिकाणे असल्याने एकेरी वाहतुकीने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. माणिक चौकातून मोठ्या मालवाहू गाड्यांना बाजारात, बाजारपेठेत बंदी घालण्याची मागणी होत आहे. माणिक चौक ते मार्केट यार्ड या मुख्य रस्त्यावर दुकानांसमोर वाहनांना रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडी होत होती.चाकण मधील ‘वन वे’महात्मा फुले चौकात बॅरिकेड लावण्यात आले असून, चारचाकी वाहनांना आंबेठाण चौकातून वाघेवस्तीमार्गे किंवा तळेगाव चौकातून वळून माणिक चौकमार्गे चाकण शहरात प्रवेश देण्यात येत आहे.माणिक चौकातून शहरात येणाऱ्या चारचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, एकेरी वाहतूक केल्याने या रस्त्यावर वाहतूककोंडी कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.