चाकण : गेल्या पंधरा दिवस चाकण शहरात झालेली कचराकोंडी अखेर चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सुटली. चाकणमधील कचऱ्याची वाहने चाकण- आंबेठाण रस्त्यालगतच्या दगडखाणीत खाली करण्यात आली. या बाबत संबंधित ग्रामस्थांना पुढील महिनाभरात कचऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे तसेच कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाण आणि परिसरात फवारणी करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिले.गेल्या दशकभरात चाकणसह राजगुरुनगर आणि औद्योगिक परिसरातील कचऱ्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. सध्या या संपूर्ण परिसरातून खूप मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिती होते. तब्बल पंधरा ते वीस मोठ्या कचऱ्याच्या वाहनांतून कचरा दररोज खेड तालुक्यातील विविध भागातून उचलला जातो. मात्र, या कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने व प्रक्रिया होत नसल्याने कचरा जसाचा तसा चाकण-आंबेठाण रस्त्यावर खराबवाडी (ता.खेड) हद्दीतील दगडखाणीत थेट टाकला जात आहे. चाकण नगर परिषदेसह खेड तालुक्यातील राजगुरुनगर नगर परिषद, नाणेकरवाडी, आंबेठाण, खराबवाडी आणि राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी आदी अनेक गावांतून ओला व सुका कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरातील पाणी दूषित झाले आहे. तसेच या परिसरात निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असा आरोप बिरदवडीमधील काही ग्रामस्थांनी केला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या वाहनांसह या भागात येऊन येथे वाहने अडविण्यासाठी पहारा देऊन बसलेल्या नागरिकांशी चर्चा केली. तसेच पुढील महिनाभरात चाकणच्या कचऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आणि येथे कचऱ्यातून दुर्गंधी पसरू नये म्हणूण उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कचऱ्याची वाहने ठरावीक भागात खाली करण्यात आली. या वेळी बिरदवडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप जाधव, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव चौधरी, बाबासाहेब पवार, बाळासाहेब लांडे, दिलीप लांडे, रमेश गोतारणे, साहेबराव काळडोके, राजेंद्र परदेशी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)नगर परिषदेकडून गायरान जागेचा प्रस्तावचाकण शहराची कचरासमस्या पुन्हा उद्भवणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. कचरा टाकण्यासाठी परिसरातील गायरान जागेची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात राक्षेवाडी आणि चाकण-शिक्रापूर रस्त्यालगतची वनहद्दीजवळील गायराने हे दोन पर्याय आहेत. कचरा टाकण्यात येणाऱ्या जागेजवळ पाणी, नदी असू नये असा नियम आहे.चाकणच्या राक्षेवाडीजवळील गायरान जमिनीजवळ भामा नदी असल्याने तेथे जागा मिळण्याची शक्यता मावळली आहे. आता नवीन जागेचा शोध घेऊन तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे समजते.अशा असणार उपाययोजनापरिसरातील नागरिकांना सध्या कचरा टाकण्यात येणाऱ्या दगडखाणीतून कमीतकमी त्रास होईल याची दक्षता चाकण नगर परिषद घेणार आहे. पुढील महिना-दीड महिन्यात पर्यायी जागा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कचरा एकाच ठिकाणी टाकण्यात येणार आहे. त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या वाहनांची नोंद नगर परिषद ठेवणार आहे. त्यासाठी दिवसरात्र कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात येणार आहे. कचऱ्यातून दुर्गंधी सुटूनये म्हणून त्यावर फवारणी करण्यात येणार आहे. कचरा टाकण्यात येणाऱ्या परिसरातील नागरी वस्त्यांमध्येही नगर परिषद तत्काळ फवारणी सुरू करणार आहे. केवळ चाकण परिसरातील कचरा येथे आल्यास येथे येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण तुलनेने अत्यंत कमी असणार आहे.दरम्यान,चाकणच्या कचऱ्याचा प्रश्न तात्पुरता सुटला असला तरी अन्य ग्रामपंचायती आणि शहरांचे काय? हा प्रश्न कायम आहे.चाकण नगर परिषद वगळता अन्य ग्रामपंचायती या भागात रात्रीच्या वेळी अस्ताव्यस्त कचरा टाकत असल्याने हा प्रश्न भीषण बनला आहे. अनेक हॉटेल्स, कारखानदार यांची वाहने रात्रीच्या वेळी येऊन येथे गुपचूपपणे कचरा टाकून जात असल्याची बाब समोर आली आहे. एमआयडीसी व तळेगाव (ता.मावळ) भागातून येथे खराबवाडी-वाघजाई नगर रस्त्याने वाहने येऊन कचरा टाकत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या वाहनांची नोंद चाकण नगर परिषदेच्या वतीने ठेवण्यात येणार आहे. - अशोक साबळे, मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद
चाकणची कचराकोंडी सुटली
By admin | Published: October 20, 2015 3:06 AM