आंबेठाण : औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसारात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, प्रशासन छोट्या व्यावसायिकांवर लुटुपुटची कारवाई करून मोठ्या व्यावसायिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. चाकणचा झपट्याने विस्तार होत आहे. याबरोबरच या परिसरात अनेक अवैध धंद्यांना उत आला आहे. न्यायालयाने महामार्गावरील बार बंद केल्याने या धंद्यांना तर आता उतच आला आहे. चाकण परिसरात ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. मात्र, चाकण शहरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दुकानांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. औद्योगिक वसाहतीतही हीच अवस्था आहे. एमआयडीसीमधील जवळपास सर्वच गावांत गावठी दारूची दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर प्रवासी वाहतूकही केली जाते. नियमांची पायमल्ली करत क्षमतेपेक्षा जास्त माल भरून त्याची वाहतूक केली जात आहे. अनेकांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो. बेशिस्त वाहतूक चौकातच उभी केली जात आहे. या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. नुकतीच चाकण पोलिसांनी गुटखा पकडला. मात्र, चाकणमधील पानपट्ट्यांवर मात्र जादा किमतीने गुटखा विकला जात आहे.
चाकणला अवैध धंद्यांवर कारवाईचा फार्स
By admin | Published: April 26, 2017 2:56 AM