लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची कोरोना तपासणी करावी लागणार असून, शिक्षण व आरोग्य विभागाने कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ७ लाख १८ हजार ९०५ असून, शिक्षकांची संख्या सुमारे २० हजार आहे.
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करताना करावी लागणार आहे. त्यासाठी शिक्षकांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने तपासणी केंद्रांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे शिक्षकांची कोरोना तपासणी येत्या २७ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
-------------------
जिल्ह्यातील शाळांची संख्या -: ७,१८८
जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या :- २०,०००
-----------------
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या
पाचवी -१ लाख ८९ हजार ९९८
सहावी -१ लाख ८३ हजार २१४
सातवी -१ लाख ७७ हजार ८७३
आठवी - १ लाख ७० हजार ८२२
-------------------
शिक्षकांच्या कोरोना चाचणीशिवाय शाळा सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे तालुका तापळीवर कोरोना तपासणीची क्षमता वाढविण्याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल. येत्या २७ जानेवारीपर्यंत अधिकाधिक शिक्षकांची तपासणी केली जाईल.
- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
----------------------
कोरोना तपासणीची तयारी काय?
शिक्षकांची संख्या आणि कोरोना तपासणीवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्यात याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात केली जाणार आहे.