पुणे : जनवाडी, पाटील इस्टेट, कामगार पुतळा, कस्तुरबा वसाहत यांसारखा झोपडपट्टीच्या भागाबरोबरच भोसलेनगर, अशोक नगर सारखा उच्चभ्रू भाग असा संमिश्र असलेल्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रामुख्याने विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड आणि पाटील इस्टेट येथील वाहतुकीचा प्रश्न, आरोग्य, स्वच्छता या समस्या दूर करण्याचे मोठे आव्हान आहे़सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाकडेवाडी या प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पाटील इस्टेट, भोसलेनगर, कामगार पुतळा वसाहत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी, संगमवाडी, मुळा रोड, कस्तुरबा वसाहत, गोखलेनगर, जनवाडी, चतु:शृंगी असा भाग येतो़ मोठी हद्द आणि एकमेकांशी फारसा संबंध नसलेल्या या प्रभागात तीन वेगवेगळे भाग एकत्र केले आहेत़ त्यामुळे कोणत्याही एका भागातील नगरसेवक निवडून आले तर इतर भागातील नागरी समस्यांकडे ते लक्ष देतील का असा प्रश्न येथील रहिवाशांना आतापासूनच पडू लागला आहे़ गोखलेनगर भाग कंटेनरमुक्त वॉर्ड योजनेत सहभागी केल्याने येथील कचऱ्यासाठी घंटागाड्या उपलब्ध असल्या तरी अजूनही ओला, सुका कचरा वेगळा ठेवला जात नाही़ याशिवाय या प्रभागात बायोगॅस प्रकल्पाचे आरक्षण झाले असले तरी तो अजूनही मान्यतेच्या पातळीवरच आहे़ विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, पाटील इस्टेट येथील वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या या प्रभागात जाणवते़ त्यावर तोडगा काढण्यासाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या ठरल्या आहेत़ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पाटील इस्टेट येथील स्वच्छता व आरोग्याची समस्या मोठी आहे़ मुळा रोडला अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या भेडसावते़ या भागात अनेक ठिकाणी रस्त्यावरील दिवे आवश्यक त्या प्रमाणात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ जनवाडी भागात रस्त्यावरील भाजी मार्केटमुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसते़ गेल्या काही महिन्यांत या प्रभागातील अनेक फुटपाथवर छोटे छोटे स्टॉल उभे राहिले आहेत़
स्वच्छता, आरोग्य, कोंडी दूर करण्याचे आव्हान
By admin | Published: January 11, 2017 3:48 AM