पिंपरी : शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर व्होटर्स स्लिप (मतदार चिठ्ठी) वाटण्याचे काम रविवारी करण्यात आले. मात्र, मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांची प्रतीक्षा करीत कर्मचाऱ्यांना (बीएलओ) केंद्रावर बसून राहावे लागले. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघांतील साडेसात लाख अशा निम्म्यापेक्षा अधिक उर्वरित मतदारांना सोमवारी आणि मंगळवारी असे केवळ दोन दिवसांत स्लिप वाटण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. मतदान केंद्रावर नागरिक येण्याची वाट पाहत बीएलओ बसले होते. आडनावाप्रमाणे तयार केलेल्या मतदारयादीतून नाव शोधून काढत मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्लिप दिल्या जात होत्या. स्लिप दिल्यानंतर यादीवर मोबाईल क्रमांक नोंदवून स्वाक्षरी घेतली जात होती. आजूबाजूच्या नागरिकांच्याही स्लिपा त्याच्याकडे दिल्या जात होत्या. एका कागदावर अनेक स्लिपा होत्या. त्या फाडण्यासाठी काही बीएलओकडे साहित्य नव्हते. हाताने फाडून स्लिपा दिल्या जात होत्या. नागरिक येत नसल्याने बीएलओ मतदारांना मोबाईल करून बोलावून घेत होते. केंद्रावर येऊन स्लिप घेऊन जाण्याचे आवाहन करीत होते. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत स्लिपा वाटपाचे आव्हान
By admin | Published: October 13, 2014 12:40 AM