सोमेश्वरनगर : राज्यातील गळीत हंगाम लवकरच सुरू होणार आहे. साधारणत: ८२५ लाख टन उसाचे गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे. त्यातच साखरेचे उतरलेले दर, ऊसतोडणी, वाहतूकदारांचा संप, शिल्लक साखर, या कारणांमुळे सहकारी साखर कारखानदारी आणखी अडचणीत येणार आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.राज्यातील साखर कारखाने सुरू करण्यासाठी मंत्री समितीने १५ आॅक्टोबर ही मुदत दिली आहे. यासाठी कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. राज्यातील १०० सहकारी व ६५ खासगी कारखान्यांपैकी सर्वच कारखाने हंगाम सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप मिटेपर्यंत कारखान्यांची धुराडी पेटणार नाहीत. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू आहे. त्यामुळे संपावर तोडगा काढण्याचा निर्णय कोणी घ्यायचा, हा प्रश्न पडला आहे. कारखाने लवकर सुरू झाले तरच उसाचे गाळप वेळेत पूर्ण होईल. अन्यथा काही कारखान्यांना त्यांचे गाळप पूर्ण करण्यासाठी जून महिना उजाडेल. चालू वर्षी उसाचे वाढलेले क्षेत्र पाहता इतर जे कारखाने बंद आहेत, त्यांना पॅकेज उपलब्ध करून देऊन ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यातील २१३ कारखान्यांपैकी अवघे १६५ कारखानेच सुरू होणार आहेत, तर उर्वरित साखर कारखाने बंद अवस्थेतच आहेत. मंत्री समितीने कारखाने चालू करण्यासाठी १५ आॅक्टोबर ही तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील २१३ साखर कारखान्यांपैकी १६५ साखर कारखान्यांनी १ आॅक्टोबरपर्यंत आपले गाळप परवानगीचे अर्ज प्रादेशिक सह संचालकांकडे दाखले केले आहेत. या कारखान्यांना राज्यातील ८२५ लाख टनाचे गाळप करावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात ९० ते ९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. जरी साखर कारखान्यांना, १५ आॅक्टोबर ही तारीख दिली असली, तरीही राज्यातील साखर कारखान्यांना कारखाने सुरू करण्यासाठी १ नोव्हेंबरचीच वाट पाहावी लागणार आहे. (वार्ताहर)
ऊसगाळपाचे यंदा आव्हान
By admin | Published: October 07, 2014 6:12 AM