पुणे : महाविकास आघाडीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. मात्र, पर्वतीमधून काँग्रेसचे आबा बागुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. कसबामधून काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली असून, तिथे काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे बागुल आणि व्यवहारे यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान काँग्रेस पक्षापुढे आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसकडे शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट हे तीन मतदारसंघ आहेत. त्यापैकी कसबामधून काँग्रेसने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाही. कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी माजी महापौर कमल व्यवहारे इच्छुक होत्या; पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज झाल्या आहेत. कमल व्यवहारे या सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे कसबा मतदारसंघातील कमल व्यवहारे यांचे बंड डोकेदुखी ठरणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आलेला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी आबा बागुल प्रयत्नशील होते; पण पर्वतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पर्वतीमध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी लढणार असल्याचे आबा बागुल सांगत आहेत. बागुल यांच्या समर्थनार्थ सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन्स येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांची बैठक पार पडली. यावेळी अपक्ष निवडणूक लढवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला असून, यंदा पर्वतीमध्ये पर्वती पॅटर्न चालवायचा आहे. त्यासाठी वेळ प्रसंगी पक्षाचे राजीनामे देण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी ठेवली असल्याने आता पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्याचे काँग्रेसपुढे मोठे आव्हान असणार आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मनीष आनंद हे अपक्ष उमेदवारी अर्ज सोमवारी भरला आहे. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघातही बंडखोरी रोखण्याचे आव्हान काँग्रेस पक्षापुढे असणार आहे.