पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून भाजप व काँग्रेसमध्येच मुख्य लढत होणार आहे. भाजपला २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक मते देणाऱ्या कोथरूडमधील (मिळालेली मते १,४८,५७०) आपले मताधिक्य कायम राखण्याचे आव्हान आहे. तर, दुसरीकडे विधानसभेत भाजपचा हक्काचा कसबा मतदारसंघ हिसकावून घेणाऱ्या काँग्रेसला कसब्यातील ही आघाडी अन्य ५ मतदारसंघांत निर्माण करण्याचे आव्हान राहणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांत १ लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले होते. केवळ शिवाजीनगर व पुणे कँटोनमेंट येथे हा आकडा दहा ते पंधरा हजारांच्या आसपास राहिला. त्यावेळी गिरीश बापट यांना ६ लाख ३२ हजार ८३५ मते मिळाली होती, तर काँग्रेसचे मोहन जोशी यांना ३ लाख ८ हजार २०७ मते मिळाली होती.
१९७१ पासून ८ निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये अण्णा जोशींच्या माध्यमातून भाजपने खाते खोलले व त्यांनी काँग्रेसच्या विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव करून भाजपला २ लाख ५० हजार २७२ मते मिळवून विजयश्री दिली. त्यानंतर प्रदीप रावत (१९९९), अनिल शिरोळे (२०१४) व गिरीश बापट (२०१९) यांच्या विजयातून भाजप पुण्यात प्रथमस्थानी राहिला.
आता हा विजयाचा मेरू रोखण्यासाठी काँग्रेसने भाजपचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या कसब्यात काँग्रेसला विधानसभेत विजयी करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. पण, कसब्यात काँग्रेसला विधानसभेत मिळालेली ७३ हजार ३०९ मते या लोकसभेत कायम ठेवून, ही सुमारे ११ हजार मतांच्या आघाडीची पुनरावृत्ती अन्य पाच मतदारसंघांत करण्यासाठी मोठा संघर्ष त्यांना करावा लागणार आहे. काँग्रेसमधील नाराजी दूर करून अन्य पाच मतदारसंघांत सर्वदूर पोहोचण्याचे काम रवींद्र धंगेकर यांना करावे लागणार आहे.
भाजप विजयाची हॅटट्रिक करणार का?
सन २००४ पासून काँग्रेसच्या ताब्यात असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ त्यांची हॅटट्रिक रोखून ताब्यात घेणाऱ्या भाजपला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणाऱ्या भाजपला हे मताधिक्याने मुरलीधर मोहोळ यांच्याकडून कायम ठेवण्यात कितपत यश येते? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष व अपक्ष कार्यकर्त्यांसमोर २०१९ मध्ये घसरलेला मतदानाचा टक्का वाढविणे व अधिकाधिक मतदारांना १३ मे च्या रणरणत्या उन्हात बाहेर काढण्याचे चॅलेंज स्वीकारावे लागणार आहे. २०१९ मध्ये शहरात ४९.८४ टक्के मतदानाची नोंद झाली होती, ती २०१४ मध्ये ५४.१४ टक्के इतकी होती. त्यामुळे मतदानाचा ५ टक्क्यांनी घसरलेला हा आकडा पुन्हा ५० च्यावर नेणे व अधिकाधिक मतदान आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
कसब्यात झाले होते सर्वाधिक, तर वडगावशेरीत सर्वात कमी मतदान.
कसबा विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत शहरातील ६ मतदारसंघात सर्वांधिक मतदान झाले होते. ही टक्केवारी ५५.८८ टक्के इतकी होती. कसब्यातील हा टक्का कायम राखला गेला तर, एक वर्षापूर्वी विधानसभेवर निवडून आलेल्या रवींद्र धंगेकर यांना ती जमेची बाजू ठरू शकते. २०१९ मधील पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ७५ हजार ३९ मतदारांपैकी १० लाख ३४ हजार १३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी सर्वाधिक कमी मतदान हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात झाले होते, ही टक्केवारी ४६.४१ टक्के इतकी होती. अन्य मतदार संघातील मतदानाची टक्केवारी : शिवाजीनगर - ४६.९४ टक्के, कोथरूड : ५०.२६ टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट : ४९.८२ टक्के, पर्वती : ५२.०४ टक्के
२०१९ मध्ये विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान
वडगावशेरी
भाजप : १,१७,६६४काँग्रेस : ६०,८४३वंचित आघाडी (अनिल जाधव) : २१,०८४
शिवाजीनगर
भाजप : ७७,९८२काँग्रेस : ४८,४५०वंचित आघाडी : ११,३७६
कोथरूड
भाजप : १,४८,५७०काँग्रेस : ४२,३७४वंचित आघाडी : ४,४७०
पर्वती
भाजप : १,१६,८९९काँग्रेस : ५०,५६७वंचित आघाडी : १०,६९९
पुणे कॅन्टोन्मेंट
भाजप : ६७,१७७काँग्रेस : ५४,४४४वंचित आघाडी : १४,६९९
कसबा पेठ
भाजप : १,०३,५८३काँग्रेस : ५१,१९२वंचित आघाडी : २,४७१
टपाली मते
भाजप : ९६०काँग्रेस : ३३७वंचित आघाडी : ५९
एकूण मतदार
भाजप : ६,३२,८३५काँग्रेस : ३,०८,२०७वंचित आघाडी : ६४,७९३