भोर : बॅनर, पोस्टर, रॅली, प्रभातफेरी, जेवणावळी आणि घरोघरी जाऊन होणाऱ्या प्रचारामुळे लाखो रुपयांच्या उलाढालीने भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. तरुण कार्यकर्ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या. त्यांनी प्रस्थापितांपुढे कडवे आव्हान उभे केले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातून अनेक धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठेपायी लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे. भोर तालुक्यातील १५५पैकी ७० ग्रामपंचायतींपैकी चिखलगाव, भोलावडे, पोम्बर्डी, पान्हवळ, गवडी, बाजारवाडी, नायगाव, तांभाड, मोहरी बुदुक, म्हाळवडी, हातवे खुर्द या ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर ५९ ग्रामपंचायतींच्या ५४३ जागांसाठी ७६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ५० टक्के आरक्षणामुळे यात २७२ महिलांचा समावेश आहे. ७० पैकी ३५ ग्रामपंचायतींच्या सरपंच महिला होणार आहेत. पोटनिवडणुका लागलेल्या ४७ ग्रामपंचायतींच्या ८७ जागांपैकी ५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने ८२ जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत. तालुक्यातील महामार्गावरील पूर्व भागात असणाऱ्या विविध कंपन्या, कारखाने व बागाती क्षेत्रामुळे ग्रामपंचायती सधन आहेत. या गावांच्या सत्तेची चावी आपल्या हातात राहावी यासाठी सर्व पक्षांचे प्रयत्न सुरूआहेत. यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस असा तिरंगी सामना पाहावयास मिळत आहे. अनेक गावांतील तरुण कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीतील प्रस्थापितांना या वेळी पहिल्यांदाच मोठे आव्हान निर्माण झाले आहे.या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येक जण सर्वतोपती प्रयत्न करीत आहेत.
तरुणांचे प्रस्थापितांना आव्हान
By admin | Published: August 03, 2015 4:25 AM