पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सदू शिंदे क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या गटात पीएमपी ग्रुप संघाने विजेतेपद पटकावले. पीएमपी ग्रुपने अंतिम लढतीत आझम स्पोर्ट्स अकादमीवर आठ गडी राखून विजय मिळवला.
डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना आझम स्पोर्ट्स अकादमीने ३७.५ षटकांत सर्वबाद १५९ धावा केल्या. पीएमपी ग्रुपने २७.२ षटकांत दोन बाद १६१ धावा करून विजय मिळवला. आझम स्पोर्ट्स अकादमीकडून रसिका शिंदे ६८, किरण नवगिरे २८ यांनी झुंज दिली. पीएमपीकडून श्रुती आणि वैष्णवी काळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पीएमपीकडून माधुरी आघाव (नाबाद ६६) आणि श्वेता जाधव (नाबाद ५१) यांनी संघाला विजय मिळवून दिला. माधुरी आघावला सामनावीर किताब देण्यात आला. वेंकटेश बिल्डकॉनचे चेअरमन अंकुश असबे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. २९८ धावा करणाऱ्या श्वेता सावंत हिला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. तर पीएमपीची आरती केदार (९ बळी) उत्कृष्ट गोलंदाज ठरली. २९७ धावा आणि नऊ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या किरण नवगिरे हिला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिया यादव हिला उत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून पुरस्कृत करण्यात आले. या प्रत्येक खेळाडूला सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
यावेळी अप्पा पंडित, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव अजय गुप्ते, माजी रणजीपटू श्रीकांत जाधव, गिरीश कुलकर्णी, महेश घोरपडे, पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अरविंद शिवले, चेअरमन भूषण देशपांडे, उपाध्यक्ष लहू पाटील, उपाध्यक्ष मुजावर लायकअली, मकरंद भिडे, भारत मारवाडी उपस्थित होते.
फोटो ओळी -
सदू शिंदे क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा पीएमपी ग्रुप संघ.
---------------------------------------------