पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरात रविवारी संपूर्ण दिवसभर आकाश ढगाळ होते. सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शहरातील आद्रतेचे प्रमाण ८४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याचा परिणाम किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या हिवाळा आहे की, पावसाळा असा संभ्रम निर्माण व्हावा, असे दृश्य शहरात दिसत आहे. रविवारी सकाळी शहरात किमान तापमान १८.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत ७.५ अंश सेल्सिअसने अधिक आहे. आज दिवसभरात आकाश संपूर्णपणे ढगाळ होते. कधीही पाऊस पडले, अशी स्थिती दिसून येत होती. त्याचवेळी ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. रविवारी सायंकाळी शहरात २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ते सरासरीच्या तुलनेत १.२ अंश सेल्सिअसने घटले आहे. सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहणार असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिवसाचे तापमान ३० अंश तर रात्रीचे तापमान १८ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.