पुणे : राज्यामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे.
राज्यात २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाचे वातावरण असणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि.२९)पासून वातावरण निवळून त्यापुढील ३ आठवड्यापर्यंत दुपारच्या कमाल तापमानात घट जाणवून दिवसाचा ऊबदारपणा कमी होईल. तसेच दिवसाही काहीसा गारवा जाणवू शकतो. तर शुक्रवार ८ डिसेंबरपासून किमान तापमानताही हळूहळू घसरण होवून थंडीला सुरवात होवू शकते, असे हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी सांगितले.
सध्या गारपीट होण्याचा काळ नाही. तरी देखील गारपीट होण्याची शक्यता जाणवत आहे. अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत पश्चिम किनारपट्टी समांतर पृष्टभागापासून दीड किमी उंचीच्या जाडीच्या हवेच्या कमी दाबाचा आस निर्माण झाला आहे. वायव्य उत्तर भारतातून थेट मध्यप्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच तेथून दक्षिण कोकण किनारपट्टीसमोर अरबी समुद्रात ६ किमी. उंचीच्यावर निर्मित हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम म्हणजे होणारी गारपीट आहे.
तमिळनाडू, केरळ भू -भाग ओलांडून दीड ते दोन किमी. उंचीपर्यंत 'पुरवी' वारा प्रणाली अरबी समुद्रात उतरून विकसित होईल. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करून वरील पश्चिमी झंजावात प्रणालीत होणाऱ्या विलीनिकरणामुळे दोन प्रणाल्याच्या संयोगातून गारपीटीची शक्यता वाढली आहे, असे खुळे यांनी सांगितले.
पुण्यात ढगाळ वातावरण
पुण्यात किमान तापमान १७.३ नोंदवले गेले. त्यामुळे थंडी थोडी कमी झाल्याचे जाणवत आहे. २५ नोव्हेंबर रोजी आकाश ढगाळ राहील. मेघगर्जनासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.