पुणे: शहरात येत्या दोन दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दुपारी निरभ्र आकाश असेल आणि सायंकाळी ढगांची गर्दी होऊन जलधारा कोसळतील.
गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात पावसाने सायंकाळी हजेरी लावत पुणेकरांची तारांबळ उडवली आहे. येत्या दोन दिवसांमध्येही तो अवकाळी अवखळपणे सायंकाळी हजेरी लावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. २० एप्रिलपर्यंत ही स्थिती असणार आहे, तर २१ एप्रिलपासून आकाश निरभ्र राहील, असेही हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
सोमवारी शिवाजीनगर आणि पाषाण या भागात आकाशामध्ये क्युम्युलोनिंबस ढगांची दाटी झालेली दिसून आली. या ढगांमुळे कमी वेळेत अधिक पाऊस पडतो. ही स्थिती पुढील दोन दिवस सायंकाळी आकाशात होण्याची शक्यता आहे. कोरेगाव पार्क येथे काल सर्वाधिक ४१.१ तापमानाची नोंद झाली, तर वडगावशेरी ३९.३, मगरपट्टा ३८.८, शिवाजीनगर ३८.२, एनडीए ३७.७, हवेली ३७.६. पाषाण ३७.६ तापमान नोंदविले गेले.