दक्षिण व मध्य भारतात द्रोणीय स्थिती; महाराष्ट्रातील 'या' भागात अवकाळी पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:12 PM2022-03-10T12:12:15+5:302022-03-10T12:14:33+5:30
महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण
पुणे : दक्षिण भारत व मध्य भारतात एकाचवेळी दोन ठिकाणी द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली असून उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट झाली. विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
या द्रोणीय स्थितीमुळे कोकण, गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. आज दिवसभरात नाशिक १, औरंगाबाद ०.३, अकोला ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा तसेच औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
तर, शुक्रवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गुरुवारी व शुक्रवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट झाली. नाशिक, औरंगाबाद, अकोल्यात जोरदार पाऊस झाला आहे