लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कनार्टक किनारपट्टीपासून ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूर ०.६, दाभोलीम येथे ०.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिक येथे ६ मिमी पावसाची नोंद झाली होती. पुण्यात सायंकाळी उशिरा पावसाच्या जोरदार सरी आल्या.
गेल्या काही दिवसांपासून पंजाबपासून दक्षिण अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे गुजरातसह राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आज कर्नाटकापासून महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची शक्यता वाढली आहे.
या वातावरणामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर विदर्भाच्या बर्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
८ व ९ जानेवारी रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
८ जानेवारी रोजी नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
९ जानेवारी रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची आहे. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
१० जानेवारी रोजी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.