पुणे : गेल्या आठवड्यापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही रुग्णवाढ म्हणजे दुसऱ्या लाटेची हळूहळू सुरुवात असून, रुग्णवाढ होत राहिली, तर पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, अशी भीती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविली गेली. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या घटत गेली. परंतु, या संपूर्ण कालावधीत खाटा उपलब्धतेपासून ते व्हेंटिलेटरपर्यंत अनंत अडचणींचा सामना करावा लागला. केवळ खाटा न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्याचीच पुनरावृत्ती याही वर्षी होते की काय अशी परिस्थिती सध्या शहरात पुन्हा निर्माण होऊ शकते.
ही रुग्णवाढ होण्यास वातावरणातील बदलही काहीप्रमाणात कारणीभूत ठरला आहे. हवेत झालेला बदल, गारवा या सगळ्यांमुळे सर्दी, खोकला, ताप सदृश लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच नागरिकांमध्ये असलेली कमी झालेली भीती, आलेली बेदरकारी आणि निष्काळजीपणा यामुळे संशयित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यासोबतच मास्क वापरण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. गेल्या आठवड्यात बाधितांची शंभर-दीडशे पर्यंत आलेली संख्या आता साडेतीनशे पर्यंत गेली आहे.
मॉल, दुकाने, बाजारपेठा या सगळ्याठिकाणी सामाजिक अंतराचे निकष पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र आहे. त्याला सरकारी आणि निम सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. सॅनिटायझेशनकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
---------
पहिल्या टप्प्याचे लसीकरण नाही पूर्ण
पालिकेने प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करून मंगळवारी एक महिना झाला. परंतु, अद्यापही पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण क्षमतेने झालेले नाही. लस घेण्यासाठी मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता पालिकेला उद्दिष्ट गाठणे अवघड दिसते आहे.
----------
कोरोना रुग्णांचा वाढता आलेख
दिनांक मृत्यु चाचण्या बाधित
5 फेब्रु. - 2 - 3357 - 195
6 फेब्रु. - 0 - 3239 - 180
7 फेब्रु. - 1 - 2906 - 196
8 फेब्रु. - 4 - 1945 - 162
9 फेब्रु. - 4 - 2232 - 216
10 फेब्रु. - 5 - 3344 - 239
11 फेब्रु. - 1 - 3230 - 256
12 फेब्रु. - 5 - 3382 - 258
13 फेब्रु. - 2 - 3607 - 331
14 फेब्रु. - 3 - 3508 - 334
-----------
रूग्णवाढीची कारणे
थंडी वाढल्याने सर्दी, ताप वाढतेय
लोकांच्या मनात भीती कमी झाली हे महत्त्वाचे कारण
मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
सोशल डिस्टिन्सिंगचे पाळले जात नाहीत नियम
------------------