पुणे : संपूर्ण ढगाळ वातावरण,अंगाचा झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अशा परिस्थितीत पुणेकरांना सोमवारी( दि. १४) हिल स्टेशनसारखे वातावरण अनुभवायला आले. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे पुणे शहर व जिल्ह्यात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी होणार असून वाहनचालकांसाठी हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. दृश्यमानता कमी असल्याचे काही अंतरावरील वाहने दिसू शकणार नाही. त्यामुळे महामार्गावरुन वेगाने जाताना पुढील अवजड वाहन न दिसल्याने त्याला पाठीमागून धडकण्याची शक्यता वाढते. रस्त्यावरुन जाताना विशेषत: महामार्गावरुन जाताना वाहनचालकांनी आपल्या वाहनाची गती कमी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहरात आज सकाळपासूनच दाट धुके, ढगाळ हवामान आणि अधूनमधून येणारा पाऊस असे वातावरण दिसून येत होते. दिवसाच्या तापमानात मोठी घट झाल्याने पावसाबरोबरच थंडीही जाणवत होती. रविवारी कमाल तापमान २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यात सोमवारी आणखी घट होऊन ते २३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने कमी आहे. त्याचवेळी रात्रीच्या तापमानात वाढ झाली असून सोमवारी सकाळी किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ते सरासरीपेक्षा ६.५ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
शहरात आज दिवसभर पावसाळी वातावरण होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अधून मधून पावसाची एखादी सर जोरात येत होती. दुपारपर्यंत अधूनमधून पाऊस पडत होता. दुपारनंतर सूर्यदर्शन झाले तरी आकाशात पुन्हा ढगांची गर्दी होत होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे ५ मिमी तर लोहगाव येथे २ मिमी पावसाची नोंद झाली.
शहरात मंगळवारी आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.