पुणे : शिक्षण क्षेत्रात बोगस पदव्यांचा सुळसुळाट असल्याची चर्चा असते. त्यातच चक्क पुण्यातील एका कुलगुरुंची पीएचडी बोगस असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्पायसर विद्यापीठाच्याच कुलगुरूची पीएचडी बोगस असल्याचे पोलीस तपासणीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी कुलगुरू, दोन प्राध्यापक यांच्यासह पाच जणांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कुलगुरू नोबल प्रसाद पिल्ले , मुख्य वित्तीय अधिकारी रत्नास्वामी जयेम, कला शाखेचे प्रमुख चाको पॉल, क्रिएटीव्ह एज्युकेशनल फाऊंडेशनचे संचालक गोपाल भिकाजी खंदारे आणि या बनावट पदव्या मिळवून देणारा अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अलेन केरी अलमेडीया (वय ५३, रा. सॅलसबरी पार्क)यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
दोन वर्षापूर्वी अॅडव्हेंटीस्ट टायडींग्ज मॅगझीन व अॅडव्हेंटीजस्ट हॅरीटेस्ट या मासिकांमध्ये नोबल पिल्ले, चाको पॉल आणि जेयम यांना पीएचडी मिळाल्याचे वृत्त अलमेडीया यांनी वाचले होते. यासंदर्भात त्यांनी स्पायसर अॅडव्हेंटीस्ट युनिवर्सीटी यांना माहिती अधिकार कायद्याअंतर्गत याची माहिती मागितली होती. परंतू, विद्यापीठाने आम्ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत येत नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर अलमेडीया यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांना याबद्दल माहिती मिळाली. अलमेडीया यांनी याविरोधात राज्य शासनाकडे तक्रार केली.
राज्य शासनाने पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आयुक्त रश्मी शुक्ला, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट एकने याचा तपास केला असता, पिल्ले, चाको पॉल आणि जयेम यांनी हिमाचल प्रदेशमधील भारती युनिवर्सीटी, लाडो सुलतानापूर येथून घेतल्याचे समोर आले. त्यांनी याच पीएचडीच्या जोरावर स्पायसर विद्यापीठात या तिघांनी पदोन्नतो मिळवली. या तिघांनी गोपाल खंदारे यांच्या मदतीने मानव भारती युनीवर्सीटीकडून बोगस पीएचडी मिळवली असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेचे एक पथक हिमाचलप्रदेशात जाऊन त्यांनी मानव भारती विद्यापीठात या पीएचडीसंदर्भात चौकशी केली असता, त्यांनी या तिघांना पीएचडी दिलीच नसल्याचे समोर आले. त्यानुसार या पाच जणांवर स्पायसर विद्यपीठाची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास युनीट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील करत आहेत.