पुणे : ज्यांचा या ओबीसी लढ्याशी संबंध नाही ते दंगली कशा वाढतील अशी वक्तव्य करत आहेत. तीन डिसेंबरनंतर हिंदु मुस्लिम किंवा ओबीसी विरूध्द मराठा यांच्या दंगली हाेण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा सतर्कतेचा इशारा स्थानिक पाेलीस ठाण्यांना आला आहे. येत्या आठ डिसेंबर ला मुंबईत आझाद मैदानात शांती सभा घेण्यात येणार आहेत. मुस्लिम संघटना आणि आम्ही त्या सभेला उपस्थित राहणार आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाचा जनक मी आहे, हेच अनेकांना माहीत नाही असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंबेडकर यांनी मंगळवारी महात्मा फुले वाडयाला भेट देउन फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, महात्मा फुलेंना त्यांच्या काळात मोठा त्रास देण्यात आला. जे धार्मिक स्वातंत्रयासाठी लढले त्यांना देशभक्त ठरवण्यात आलं. तर जे सामाजिक स्वातंत्र्यसाठी लढले त्यांना ब्रिटिशांचे हस्तक ठरवण्यात आलं. आजही तीच परिस्थिती आहे.
देशाला हिंदु घाेषित करावे असा खटाटाेप सूरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही. आमचे त्यांना आव्हान आहे की हेच त्यांचे वक्तव्य आर एस एस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांचही असून त्यांनी ते म्हणावं तरच आम्ही मान्य करू.
चार महिन्यानंतर सत्तापरिवर्तन
सध्या मुसलमानांना व ओबीसींनाही टार्गेट केलं जातय. गेले ९ वर्षे मुस्लिमांनी अत्याचार सहन केला आहे. येणारे चार महिने ताे सहन करा. परंतू, लाेकसभेच्या निवडणुकीमध्ये बदल निश्चित हाेणार आहे. यामध्ये सरकार कुणाचे असेल हे सांगता येणार नाही. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान असणार नाहीत एव्हढी ग्वाही देताे, असेही ते म्हणाले.
युध्दाचे परिणाम भारतावर हाेणार-
पॅलेस्टाईन इस्त्रायल युद्धाची व्याप्ती वाढली तर त्याचे भारतालाही परिणाम भोगावे लागणार आहेत. कारण या गल्फ कंट्रीमध्ये ५ काेटी भारतीय आहेत. युध्द झाल तर त्यांना ताे देश साेडावा लागेल किंवा त्यांना सुरक्षित आणण्यासाठी सरकारला पूर्णपणे बाेजा उचलावा लागले.
मी भुजबळांना तुरूंगातून बाहेर काढले
माझी भुजबळ यांच्याविषयी नाराजी नाही. पण, त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात मीच आहे. मी कोर्टाला शिव्या घातल्या नसत्या ते बाहेर आले नसते. भुजबळ यांनी आम्हाला सोबत यावं असं म्हटलं असेल तरी आम्हाला त्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.