भिगवण : भिगवण पोलिसांनी सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीच्या चंदनासोबत तीन चंदनतस्करांना वाहनासमवेत जेरबंद केले.याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस नाकाबंदी करीत होते. पोलीस हवालदार नाना वीर, गोरख पवार यांना अज्ञात व्यक्तीकडून माहिती मिळाली. एका मारुती स्विफ्ट कारमधून काही चंदनचोर भिगवण-राशिन रोडवरून जाणार असल्याची माहिती त्यांना समजली. त्यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरील नाकाबंदीमध्ये वाढ केली. डिकसळ परिसरात अशी संशयित गाडी दिसताच ती थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीचालकाने गाडी न थांबवता वेगात भिगवणच्या दिशेने नेली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून भैरवनाथ मंदिराशेजारील जाधव याच्या पेट्रोल पंपासमोर स्विफ्ट गाडी (क्र. एमएच १६, ए.बी. १०२२) अडवली. या वेळी गाडीची तपासणी केल्यानंतर चंदनाचे ४९ किलो वजनाचे अंदाजे १,०७,८०० रु. किमतीचे तुकडे मिळून आले. या वेळी पोलिसांनी बाळू पोपट मेढे, अनिल धोंडिबा नवले, मनोहर बाळासाहेब बळे (सर्व रा. भांबोरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना अटक केली. तपासात पोलीस नाईक नाना वीर, गोरख पवार, अभिजित एकशिंगे, अविनाश काळे यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
भिगवण पोलिसांकडून चंदनतस्कर जेरबंद
By admin | Published: May 16, 2015 4:06 AM