पुणे : आमच्यात कोणतेही कोल्डवॉर नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे काम चांगले आहे. एका खुर्चीवर दोघांचे डोळे कसे असणार, असा प्रश्नही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. ते चांदणी चौकातील पुलाच्या लोकर्पण कार्यक्रमात बोलत होते. पुण्यातील पालकमंत्री पदावरून कोणताही वाद नाही. पुण्यातील ध्वजारोहण प्रत्येक वर्षी राज्यपाल करतात, असंही पवार म्हणाले.
यावेळी पवार म्हणाले, नितीन गडकरी यांनी पुण्यातील रस्त्यासांठी ४० हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. आमचं गडकरी आणि फडणवीस या दोघांवरही प्रेम आहे. सर्वांच्या मदतीने लवकरच पुण्यातील रिंग रोडचा प्रश्न सुटणार आहे. तसेच दोन महानगरांमध्ये मेट्रोचे जाळेही वाढवायचे आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. आज पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोनं प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला.