पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. आज पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पुढील ५० वर्षांचा विचार करुन चांदणी चौक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला दीड लाख वाहने या ठिकाणावरुन सुसाट धावू शकतील. १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. हे नुतनीकरणाचे काम फेब्रुवारी २०१९ ते १२ ऑगस्ट २०२३ कालावधीत पूर्ण झाले.
कसा आहे चांदणी चौक पूल-
- साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
- मुंबईवरुन साताऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन
- मुळशीला जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
- बावधन, मुळशी आणि एनडीएकडून कोथरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन लेन
- बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतारामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती.
- प्रकल्पासाठी ८६५ कोटी रुपये खर्च
- ८३ हजार क्यूबिक मीटर क्राँक्रीटचा वापर
- ५ हजार ७५० मेट्रिक टन स्टीलचा वापर
- मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सेवा रस्ते
राज्यातील महामार्गांवर वाहतुकीचे नवे नियम?
गेल्या काही दिवसांपासून महामार्गांवरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच समृद्धी महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांबद्दलही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीत राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आढावा घेणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील महामार्गांवर अनेक नवे वाहतूक नियम लागण्याची शक्यता आहे.
नाराजीनाट्यानंतर मेधा कुलकर्णींची उपस्थिती-
नाराजीनाट्यानंतर कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णीही कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली होती. पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोथरूडच्या आमदार असताना त्यांनी चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख खुद्द वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणात केला होता. या सोहळ्यालाच स्वःपक्षीय नेत्यांकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उपरेपणाची वागणूक मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज नितीन गडकरींकडून मेधा कुलकर्णी यांची नाराजी दुर केली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
यापूर्वी या कामाला १ मे, १५ जुलै असा मुहूर्त मिळाला होता. या चौकातील कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, काही काम झाल्यानंतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळे आले. त्यामुळे हे काम रखडले. त्यानंतर या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील कोंडीत अडकावे लागले. शिंदे यांनी या कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. त्यानंतर भूसंपादनासह या चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावर यशस्वीपणे मात करत हे काम पूर्ण झाले.