पुणे : अमनज्योत कौरने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर चंडीगडने वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर तीन गडी राखून विजय मिळवला.
जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राला ५० षटकांत सहा बाद २१२ धावा करता आल्या. चंडीगडने ४९.२ षटकांत सात बाद २१५ धावा करताना विजय मिळवला. महाराष्ट्राकडून सलामीवीर मुक्ता मगरे (५) झटपट बाद झाली. त्यानंतर ऋतुजा देशमुख (४०) आणि शिवाली शिंदे (१९) यांनी दुसºया गड्यासाठी ४६ धावा जोडल्या. त्यानंतर आदिती गायकवाड (३९) आणि अनुजा पाटील (२३) यांनी चौथ्या गड्यासाठी ५० धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. अनुजा पाटील बाद झाल्यानंतर सायली लोणकरने ५३ चेंडूंत नाबाद ४७ धावांची भागिदारी करत संघाला दोनशेचा टप्पा पार करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. प्रियांका गारखेडेने नाबाद १९ धावा करत तिला साथ दिली. चंडीगडकडून पी. गुलेरिया हिने दोन तर कुमारी शिबी आणि रजनी देवी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
चंडीगडच्या मुस्कान (१) हिला झटपट बाद करत महाराष्ट्राने शानदार सुरुवात केली. त्यानंतर मोनिका पांडे (१५), रजनी देवी (१२), मनिषा बाधन (१७) असे गडी बाद होत असताना अमनज्योत कौरने दुसºया बाजूने डाव सावरला. तळातील फलंदाजांच्या साथीत तिने अखेरच्या षटकात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अमनज्योत कौरने १२४ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ११० धावा केल्या. महाराष्ट्राकडून श्रद्धा पोखरकर, उत्कर्षा पवार, अनुजा पाटील, मुक्ता मगरे, सायली लोणकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
धावफलक : महाराष्ट्र - ५० षटकांत ६ बाद २१२. मुक्ता मगरे ५, ऋतुजा देशमुख ४०, शिवाली शिंदे १९, आदिती गायकवाड ३९, अनुजा पाटील २३, सायली लोणकर नाबाद ४७, ऋतुजा गिलबीले ७, प्रियांका गारखेडे नाबाद १९. अतिरिक्त १३. गोलंदाजी - पी. गुलेरिया २-२४, कुमारी शिबी १-३२, रजनी देवी १-४९.
चंडीगड - ४९.२ षटकांत ७ बाद २१५. मोनिका पांडे १५, मुस्कान १, अमनज्योत कौर नाबाद ११०, रजनी देवी १२, मनिषा बाधन १७, पी. गुलेरिया २५, शिवांगी १, काश्वी गौतम १५, सुमन नाबाद १. अतिरिक्त १८. गोलंदाजी - श्रद्ध पोखरकर १-१९, उत्कर्षा पवार १-१७, अनुजा पाटील १-४३, मुक्ता मगरे १-२९, सायली लोणकर १-२८.
---------------------------------------------------