राजेंद्र मांजरे/ लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : कर्मचाऱ्यांची दांडी, रुग्णालय परिसरात अस्वच्छता, पाणीटंचाई यंसारख्या समस्यांमुळे चांडोली उपजिल्हा रुग्णालय सलाईलनवर आहे. येथील असुविधांमुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या रुग्णालयाची ही अवस्था झाल्याचा आरोप येथे येणाऱ्या रुग्णांनी केला आहे. राजगुरुनगर शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर हे रुग्णालय आहे. येथील अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी वेळेवर येत नाही. त्यामुळे रुग्णांना तासनतास वाट पाहावी लागते. रुग्णालयात पाणी नसल्याने रुग्णालय परिसरात सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण आहे. स्वच्छतागृहांमधे पाणीच नाही. त्यामुळे सर्वाधिक गैरसोय माहिला रुग्णांची होत आहे. रुग्णाना पिण्यासही पाणी मिळत नाही. वरिष्ठांनीही या रूग्णालयाला गेल्या अनेक दिवसांपासून भेट न दिल्याने ही परिस्थीती निर्माण झाल्याचे रूग्णांचे म्हणणे आहे. सकाळी रुग्णाना व सोबत असलेल्या नातेवाईकांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी सौरउर्जा यंत्रणा बसविण्यात आली. मात्र यात कायमच बिघाड होत असल्याने गरम पाणी सोडा थंडही पाणी मिळत नाही.एखाद्या व्यक्तीला श्वान चावल्यास त्यांची लस येथे उपलब्ध नाही. यासाठी रुग्णांला पिंपरी चिंचवड येथील वाय.सी.एम रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. त्यामुळे गरिब रुग्णांचे हाल होतात. नाहीतर नाईलास्तव खाजगी डॉक्टरकडे जाऊन जादा पैसे देऊन लस घ्यावी लागते. कोणीही डॉक्टर रात्री येथे वास्तव्यास रहात नाहीत. रात्री उपरात्री अत्यवस्थ रुग्ण आला तरी, त्यांची दखल घेतली जात नाही. त्याला इतर खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखविला जातो. काही वेळेला येथील कंपाऊंडरच जुजबी उपचार करतात. वरिष्ठ अधिकारी याठिकाणी रहात नसल्याने त्यांचा येथील कर्मचाऱ्यांवरही वचक राहिलेला नाही. काही डॉक्टर पुण्यास राहण्यास असल्यामुळे ११ वाजल्यानंतरच येतात. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिला नाही. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागते. रुग्णांना बसण्यास पुरेसे बाकडे नसल्यामुळे खालीच बसावे लागत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णांलगत बांधलेले ट्रॉमा केअर सेंटर बंद आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे ठरु लागले आहे. रुग्णांना पिण्यासाठी पाण्याचे जार मागवितो. नुतनीकरणाचे काम सुरू आहे. ड्रेनचे कामपण सुरू आहे. पाण्याची पाईप नवीन करणार असून सौरउर्जा यंत्रणा बंद आहे. तीही नवीन बसविण्यात येणार आहे. निवासी डॉक्टर पुण्याला राहतात. उशिरा येणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची माहिती घेतो. ट्रॉमा केअर सेंटर कर्मचारी उपलब्ध होत नसल्यामुळे बंद आहे.- डॉ. प्रशांत शिंदे (मुख्य वैद्यकीय अधिक्षक, चांडोली उपजिल्हा रुग्णालय)
चांडोली रुग्णालय सलाईनवर
By admin | Published: May 30, 2017 1:57 AM