राजगुरुनगर : राजगुरुनगरजवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयाला असुविधांचा वेढा पडला असून, इमारतीची दुर्दशा झाली आहे. तर, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरला अवकळा आली असून, सध्या तेथे कोणीही राहू शकत नाही, अशी अवस्था झाली आहे. चांडोली येथील ग्रामीण तालुक्यातील अनेक गरीब सामान्य रुग्ण उपचारांसाठी येतात. विशेषत:, पश्चिम भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पण, प्रशासनाचे या रुग्णालयाकडे दुर्लक्ष आहे. गेले अनेक दिवस पाण्याची मोटार बंद पडल्याने रुग्णालयाला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होते. बऱ्याचदा रुग्णांना वापराचे पाणी स्वत: बाहेर जाऊन आणावे लागते. बाळंतपण करण्यासाठी पाणी नसते एवढी शोकांतिका आहे. पिण्यासाठीचे पाणी त्यांना विकतच घ्यावे लागते. रुग्णालयाचे छत ठिकठिकाणी गळू लागले असून, त्यामुळे येथे वावरताना सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो. डोळे तपासणी खोलीमध्ये तर सतत पाणी गळत असल्यामुळे ती खोलीच निकामी झाली आहे. येथील वैद्यकीय अधीक्षकांकडे पंढरपूर रुग्णालयाचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडे लक्ष देणे मुश्कील झाले आहे. या रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे नियमाप्रमाणे दुपारी एक वाजता बाह्यरुग्ण विभाग बंद होण्याऐवजी चार वाजेपर्यंत चालू राहतो. त्यासाठी या ठिकाणी अधिक लोकांची गरज आहे; पण आरोग्य विभागाचे लक्ष नाही. (वार्ताहर)एका लॅब टेक्निशियनची बदली झाल्यानंतर दुसरा माणूस आला नसल्याने डेंगी, मलेरिया, टायफॉईड, गस्ट्रो, कावीळ इत्यादी रोगांच्या चाचण्या करणे मुश्कील झाले आहे. बऱ्याचदा रुग्णांना त्या बाहेरून आणाव्या लागतात किंवा येथे एचआयव्ही चाचणी करणाऱ्या टेक्निशियनला त्या चाचण्या कराव्या लागतात. येथील पगार करणाऱ्या लेखनिकाची बदली झाली; पण त्याच्या जागेवर दुसरा माणूस न आल्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पगारच अनेक दिवसांपर्यंत होत नाहीत.‘क्वार्टर’ बनले कुत्री-मांजरांचे निवासस्थान डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ‘क्वार्टरना’ तर अक्षरश: अवकळा आली आहे. एकूण १८ क्वार्टर्सपैकी अवघ्या दोन ठिकाणी कर्मचारी कसेबसे राहतात. बाकीच्या क्वार्टर्स कुत्री-मांजरे, उंदीर-घुशींचे निवासस्थान झाल्या आहेत. दरवाजे-खिडक्या तुटल्या आहेत. संडास-बाथरूम निकामी झाले आहेत. लाईटचे वायरिंग बाद झाले आहे. सर्वत्र मण्यार, नाग, घोणस असे विषारी साप निघत असल्यामुळे त्यांमध्ये राहण्याचे लोकांनी सोडून दिले. एक-दोन ठिकाणी लोक जीव मुठीत धरून राहतात. एक डॉक्टर तर चक्क वॉर्डामध्ये खाट टाकून राहतात. क्वार्टर्सच्या चहूबाजूंनी गवत आणि झुडपे माजली आहेत. त्यांचे छत गळत आहे. त्यामुळे बहुसंख्य कर्मचारी राजगुरुनगरमध्ये भाड्याने राहत आहेत. त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.
चांडोली रुग्णालयाला असुविधांचा वेढा
By admin | Published: August 19, 2016 5:58 AM