लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोथरूडमधून आमदार झाल्यावर पुण्यात आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील पदे लिलाव करून वाटली आहेत. त्यामुळेच महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एक स्वीकृत नगरसेवक सभागृह नेता झाला,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांचा पायगुण व त्यांचा महापालिकेतील त्यांचा प्रवेश लूटमार करणारा आहे. महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून त्यांनी आता फक्त महापालिकेची इमारत विकायची बाकी ठेवली असल्याचा आरोप जगताप यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी स्थायी समितीत घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगिती मिळावी याकरिता राज्याच्या नगरविकास खात्याकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी न्यायालयातही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एखाद्या विषयावरील मतमतांतरामध्ये व आर्थिक हितसंबंधामुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. राज्य शासनासह इतर महापालिकांना ‘ब्लॅक लिस्ट’ केलेल्या आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीला रेड कार्पेट टाकून त्यांचा विषय मान्य केला जातो. यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ राजीनामा देण्याची तयारी करतात, हे प्रकार पुण्यात प्रथमच घडत आहेत, असे जगताप म्हणाले.